Saturday, February 28, 2015

कवी मनीष तपासे ’पत्ता’ शोधताहेत... पाहुयात त्यांना सापडतोय का ते?

"पत्ता"

देवा! तू राहतोस कुठे, वसतोस कुठे आणि पत्ता सांगतोस कुठला ?
तुला खरच भेटायचा मार्ग नक्की कुठला ?

मंदिरात गेलो तर तुझी मूर्ती एकटी एकटी वाटली,
धूप दीपाच्या धुराने काजळी तेवढी दाटली
वाटलं, तू असशील ध्यानस्थ, अचल आसनस्थ
मग तुझ्या आरतीत तुला शोधू लागलो,
सर्वांनी जोडले हात मी हि वाकू लागलो

पण नाही भेटलास तू तुझा पत्ता कुठला ?

देवा तू राहतोस कुठे, वसतोस कुठे आणि पत्ता सांगतोस कुठला ?
तुला खरच भेटायचा मार्ग नक्की कुठला?

चर्च मध्ये गेलो तर 'जीजस' क्रूसवर उभा दिसला,
दुरून पाहून वाटलं जणू माझ्याकडे बघून हसला
जवळ जाऊन पाहिलं तरीही त्याची करुणा नाही जाणवली,
इथे सुद्धा तू नाहीस म्हणून डोळ्यांची कडा पाणावली

प्रेयरचे सूर संपून गेले तू नाही भेटलास

देवा तू राहतोस कुठे, वसतोस कुठे आणि पत्ता सांगतोस कुठला ?
तुला खरच भेटायचा मार्ग नक्की कुठला ?

मस्जिद, गुरुद्वारा, दर्गा, समाधी आणि झाले गड,
सर्व पालथं घालूनही तुझी भेट अवघड

आणि....

आणि एक दिवस अचानक भेट तुझी झाली,
जेंव्हा माझी 'मुलगी' माझ्या आयुष्यात आली
ज्यासाठी मी वणवण फिरलो ती जागा मिळाली,
आणि 'तू' वसतोस चिमुरड्या मुलांत ही गोष्ट कळाली

आता मला शोधावं लागत नाही तुझा पत्ता कुठला ?
कळलं - तू राहतोस कुठे, वसतोस कुठे आणि तुझा पत्ता कुठला ?

तुला खरच भेटायचा मार्ग नक्की कुठला??

--- मनीष तपासे
"कविता मना-मनातली"

Friday, February 27, 2015

रेडिओ मिर्ची 98.3 एफ.एम वाहिनीवर सुप्रसिध्द आर.जे जीतूराजच्या शो मध्ये "कविता मना-मनातली" स्पेशल शो कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आणि माझ्या कवितेवर २७ आणि २८ फेब्रुवारी हे दोन दिवस मराठी भाषादिनानिमित्त प्रसारित करण्यात आला. रेकॉर्डींगच्या वेळेची काही धमाल मस्तीची छायाचित्र...कवी श्रेष्ठ बहिणाबाई चौधरी यांची कविता म्हणजे एक स्वतंत्र विद्यापीठ. त्यांच्या कविता वाचताना ही स्त्री अशिक्षीत होती हे सांगून पटत नाही कारण आपण पाहतो ते फक्तं पुस्तकी जग. भाषाशास्त्र हा विषय पदवीच्या मुलांनाही समजत नाही त्या विषयाला या कवितेच्या माध्यमातून किती सोप्या रितीने उलगडले आहे ते पहा... कविता आपल्याला आवडेल यात तीळमात्रही शंका नाही, तेव्हा कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...

Thursday, February 26, 2015

आज कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिन... "कविता मना-मनातली"कडून सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!! कुसुमाग्रजांची साहित्य संपदा म्हणजे कवितासंग्रह, कादंब-या, नाटकं, एकांकीका, कथासंग्रह... केवढी संपत्ती आपल्यासाठी ठेवलीये. आज मराठी दिनाचं औचित्य साधून कुसुमाग्रजांची मराठी भाषेची महती वर्णन करणारी कविता सादर करतोय. तसेच आज रेडीओ मिर्ची 98.3 एफ.एम या व्यावसायिक वाहिनीवर प्रा. गीतेश शिंदे यांना सुप्रसिध्द आर.जे जीतूराज याच्या शो मध्ये कुसुमाग्रजांची कविता सादर करता आली... त्यानिमित्ताने कुसुमाग्रजांचा विचार लाखो-करोडो अमराठी मुंबईकरांनीही ऐकला ही विशेष बाब... मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून आम्ही ब्लॉगर डॉट कॉमवर "कविता मना-मनातली" ब्लॉग सुध्दा सुरु करत आहे त्यालाही तुम्हा काव्यरसिकांचं प्रेम मिळेल अशी आशा करतो मित्रांनो...

Tuesday, February 24, 2015

आमच्याबद्दल थोडसं :-

’प्रिझम आर्टस्’ प्रस्तुत "कविता मना-मनातली" या कार्यक्रमातून मी गीतेश गजानन शिंदे आणि मनीष महेंद्र तपासे स्वरचित कविता सादर करून माय मराठी पालखी खांद्यावरून वाहत आहोत. त्यास तुम्हां काव्य-रसिक मित्र-मैत्रिणींची भरभरून साथ लाभते आहे. पण ही पालखी किती तरी शतकं आधीपासून विविध कवींनी आपल्या खांद्यावरून वाहिली आहे. त्यामुळे आमचा प्रवास हा आम्ही निमित्तमात्र समजतो. आम्हाला या प्रवासात वृक्षाप्रमाणे सावली देणा-या तर कधी ऊन होऊन उबदार मायेचा स्पर्श देणा-या कवींचे स्मरण म्हणून त्यांच्या शिदोरी प्रमाणे वाटणा-या कविता पोस्टर पोएट्री फॉर्ममध्ये "आमच्या मनातील कविता" या फेसबुक अल्बमच्या माध्यमातून गेली दोन वर्ष शेअर करत असून त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे आज दिनांक २७ फेब्रुबारी या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषादिनाचे निमित्त साधून "कविता मना-मनातली" हा ब्लॉग रसिकांच्या सेवेस अर्पण करत आहोत.

--- गीतेश गजानन शिंदे