Sunday, September 4, 2016

बघता बघता गणेश चतुर्थी उद्यावर येऊन ठेपली आणि सर्वांची आज लगबग उडालीय आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येण्यासाठी. काल-परवापर्यंत मुर्तीकाराचा शेवटचा हात त्याच्यावरून फिरला असेल आणि गल्लो-गल्ली त्यांची दुकानं सुध्दा मांडली गेली असतील.  हे सर्व चित्रित करणारी कवी सौमित्र यांची कविता आज "कविता मना-मनातली" ब्लॉगवर प्रसिध्द करत आहे. कविता दिर्घ असल्याने या काव्य-चित्रासोबत संपूर्ण कविता जोडली आहे...

’गणपतीचं दुकान...’

आपापल्या घरमालकांची
वाट पहात बसलेल्या मूर्ती...
कानात...हातात...सोंडात
अडकवून विकत घेणा-यांची ऐपती...
यांना मालक निवडण्याची बंदी,
त्यांना गणपती निवडण्याचं स्वातंत्र्य...
खरंच!
देवालाही स्ट्रगल चुकला नाही अजून...
गर्दीतला कोण कुणाला
दीड, पाच, सात, चौदा किंवा एकवीस दिवस वाटून देईल.
देव असून
त्यांनाही नाही ठाऊक...

आरत्या...सजावट...घमघमाट
फळफळावळं, दुर्वांच्या बागा
सिनेमे, ऑर्केस्ट्रा, नाचगाणी, फुल एन्टरटेन्मेन्ट...
उसंत मिळणार नाही यांना...
वाटून दिलेल्या वास्तव्यात
आणणारेच उचलतील
तो आपला शेवटचा दिवस मानून
वाजतगाजत करतील निरोपार्तीचा स्वीकार समुद्र किनारी...

दूर पाण्यात होडी थांबलेली...
अनेक घरचे एकाच होडीत, बुडण्यासाठी!
आता खूप आत...
बोला ’गणपती बाप्पा... मोरया...’
निघून जातील काही सुखरूप कुठेतरी...
जे थकतील
ज्यांना पोहवणार नाही ते...
सोडून देतील पाण्यात आपला एकेक अवयव...

भरती आल्यावर मग
भरून जाईल किनारा...
पण तेव्हा कुणीही देणार नाही ओळख
कुठल्याही हाताला, पायाला, सोंडेला...
वेण्यांना, फुलांना, मुकुटांना तुटलेल्या...
’पुढल्या वर्षी लवकर या’...च्या घोषात
निघालेले काही
येतीलही किना-यावर दुस-याच दिवशी
ते घोष खरे समजून...
पण मांडव
उखडलेले असतील सा-यांचेच...
मग पुढल्याच भरतीची गाडी धरुन
विदाऊट तिकीट निघून जातील सारे हळूहळू...

पण तरी...

पुढील वर्षी याच दिवसांत हेच सारे गणपती...
दुकानादुकानांतून करतील गर्दी...
हात...सोंडा...माना उंचावून
दाखवतील आपापल्या किंमती...
दरवर्षी हेच
असंच होत राहणार...
माणूस देवाला कंटाळणार नाही
की देव माणसाला...
फक्त माझ्यासारखे सा-याचाच कंटाळा आलेले
कधी देवाची बाजू घेतील
कधी स्वत:ची...

--- सौमित्र @
"कविता मना-मनातली"


1 comment: