आज जागतिक कविता दिनाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत एक आनंदाची बातमी आपल्याला सांगाविशी वाटतेय... संवेदना प्रकाशन प्रकाशित "निमित्तमात्र" या माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला तुम्ही सर्वांनी जो भरभरुन प्रतिसाद दिलात त्यामुळेच आज या शुभदिनी कवितासंग्रहाची तिसरी आवृती प्रसिध्द होत आहे. चार महिन्यात मराठी काव्यसंग्रहाची तिसरी आवृती प्रकाशित होणं हा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. त्याबद्दल तुम्हा काव्यरसिकांच्या मी ऋणात राहणं पसंत करेन. संवेदना प्रकाशनचे प्रकाशक श्री. नितीन हिरवे यांचे आभार. तसेच कवितांचे अंतरंग मुखपृष्ठावर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून जिवंत करणा-या चित्रकार, कवी श्री. विजयराज बोधनकर यांचे विशेष आभार. प्रथम आवृतीचे प्रकाशन ज्यांच्या शुभहस्ते झाले ते कवी, गजलकार श्री. वैभव जोशी, ज्यांच्या प्रस्तावनेतुन मिळालेल्या आशीर्वादाने कवितासंग्रह नवी भरारी घेण्यास सज्ज झाला त्या कविवर्य प्रसाद कुलकर्णी आणि प्रसिध्द सिनेदिग्दर्शक विजू माने यांचे मन:पूर्वक आभार! नव्या आवृतीमध्ये कविवर्य प्रविण दवणे आणि कविवर्य सतीश सोळांकूरकर यांच्या अभिप्रायाचा समावेश केला गेला आहे. तिस-या आवृतिचा प्रकाशन समारंभ माझ्या गुरुस्थानी येत्या श्रीराम नवमीच्या शुभदिनी दिनांक २८ मार्च २०१५ रोजी भक्तवात्सल्य आश्रम, कांदळी, जुन्नर येथे होणार असून सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. आपलं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या कवितेवर असंच उदंड राहू देत ही विनंती.
No comments:
Post a Comment