Saturday, February 28, 2015

कवी मनीष तपासे ’पत्ता’ शोधताहेत... पाहुयात त्यांना सापडतोय का ते?

"पत्ता"

देवा! तू राहतोस कुठे, वसतोस कुठे आणि पत्ता सांगतोस कुठला ?
तुला खरच भेटायचा मार्ग नक्की कुठला ?

मंदिरात गेलो तर तुझी मूर्ती एकटी एकटी वाटली,
धूप दीपाच्या धुराने काजळी तेवढी दाटली
वाटलं, तू असशील ध्यानस्थ, अचल आसनस्थ
मग तुझ्या आरतीत तुला शोधू लागलो,
सर्वांनी जोडले हात मी हि वाकू लागलो

पण नाही भेटलास तू तुझा पत्ता कुठला ?

देवा तू राहतोस कुठे, वसतोस कुठे आणि पत्ता सांगतोस कुठला ?
तुला खरच भेटायचा मार्ग नक्की कुठला?

चर्च मध्ये गेलो तर 'जीजस' क्रूसवर उभा दिसला,
दुरून पाहून वाटलं जणू माझ्याकडे बघून हसला
जवळ जाऊन पाहिलं तरीही त्याची करुणा नाही जाणवली,
इथे सुद्धा तू नाहीस म्हणून डोळ्यांची कडा पाणावली

प्रेयरचे सूर संपून गेले तू नाही भेटलास

देवा तू राहतोस कुठे, वसतोस कुठे आणि पत्ता सांगतोस कुठला ?
तुला खरच भेटायचा मार्ग नक्की कुठला ?

मस्जिद, गुरुद्वारा, दर्गा, समाधी आणि झाले गड,
सर्व पालथं घालूनही तुझी भेट अवघड

आणि....

आणि एक दिवस अचानक भेट तुझी झाली,
जेंव्हा माझी 'मुलगी' माझ्या आयुष्यात आली
ज्यासाठी मी वणवण फिरलो ती जागा मिळाली,
आणि 'तू' वसतोस चिमुरड्या मुलांत ही गोष्ट कळाली

आता मला शोधावं लागत नाही तुझा पत्ता कुठला ?
कळलं - तू राहतोस कुठे, वसतोस कुठे आणि तुझा पत्ता कुठला ?

तुला खरच भेटायचा मार्ग नक्की कुठला??

--- मनीष तपासे
"कविता मना-मनातली"

No comments:

Post a Comment