Sunday, June 21, 2015

आज ’फादर्स डे’ निमित्त माझ्या ’आई-बाप’ या कवितेद्वारे वडीलकीच्या नात्याला आदरयुक्त सलाम! आपणही या कवितेद्वारे आपल्या बाबांना शुभेच्छा द्यायला विसरु नका मित्रांनो... तसेच विविध कवितांच्या सुखावणा-या उजळणीसाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...

"आई...बाप"

आईच्या कविता वाचताना
विचार आला की,
आई असते आपलं सर्वस्व,
तेच असतं आपलं
पहिलं-वहिलं नातं
अन् असते तोंड ओळख जगाशी...

किती सहजतेने आपल्याला
स्वत:त रुजवणारी आई
असते मूळासारखी,
ज्यावर फुलत जातं
आपलं पान न् पान
पण या मुळाला घट्टं आधार देणारी
’बाप’ नावाची माती
तिला का असं वाळीत टाकतो ?

आई असते ज्योत
करते प्रकाशमान आपलं आयुष्य
जळत राहून स्वत:
तर बाप असतो समई
ज्यात त्याने ओतलेलं असतं
आपल्या घामाचं तेल
पोरांचं आयुष्य उजळवण्यासाठी,
ज्योत सर्वांनाच दिसते
पण समई सुद्धा जळतेच
दिसत नसलं तरी आपल्या शरीरात
त्यांचं रक्तं धावतंच ना !

आई असते रेशमी गोधडी
जिच्या धाग्या-धाग्यांत
दडलेली असते उबदार माया
तर बाप असतो वटवॄक्ष
ज्याच्या आधारावर
बहरते आपली छाया

आई असते कुंभार
करते मातीवर संस्कार
तर बाप असतो चाक
ज्याच्या फिरण्यानेच मिळतो आकार

आई असते चंदनासारखी
तर बाप असतो सहाणेसारखा
जे उगाळतात आपलं आयुष्य
मुलांची स्वप्नं सुगंधी करण्यासाठी,
चंदनाचं झिजणं सर्वांनाच दिसतं
पण सहाणसुध्दा आतल्या आत झिजतेच ना

आईच्या कविता वाचताना
विचार आला,
आई असते आपलं सर्वस्व
तर बापही असतो
घरा-दाराचं अस्तित्वं

--- गीतेश गजानन शिंदे
( निमित्तमात्र संग्रहातून )
"कविता मना-मनातली"
संपर्क - ९८२०२७२६४६

No comments:

Post a Comment